पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य; उपसंचालक सुनील कच्छवे यांचे आश्वासन

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ; नूतन उपसंचालक सुनील कच्छवे यांचे आश्वासन
लातूर, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती उपसंचालक कार्यालय, लातूर येथे नूतन विभागीय उपसंचालक म्हणून श्री. सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेत उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश धूत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित स्वागत समारंभात बोलताना नूतन उपसंचालक सुनील कच्छवे यांनी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, "मी यापूर्वी अनेक वर्षे पत्रकार म्हणून कार्य केले आहे. त्यामुळे पत्रकारितेतील अडचणी, शासनाच्या विविध योजनांशी संबंधित प्रश्न, अधिस्वीकृती, जाहिराती, शासकीय कामकाजातील अडथळे आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील."
त्यांनी पुढे सांगितले की, माहिती व जनसंपर्क विभाग हा शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. पत्रकार आणि विभाग यांच्यात समन्वय, विश्वास व पारदर्शकता कायम ठेवत शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विभाग कटिबद्ध राहील. पत्रकारांना आवश्यक त्या सुविधा, मार्गदर्शन आणि सहकार्य वेळेवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित पत्रकारांनीही नूतन उपसंचालकांचे स्वागत करत पत्रकार हिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. पत्रकारांच्या अधिस्वीकृती, शासकीय जाहिरात धोरण, माहिती उपलब्धतेची प्रक्रिया, पत्रकार कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच विभागाशी सुसंवाद वाढविण्याबाबत विविध सूचना मांडण्यात आल्या. त्यावर सकारात्मक भूमिका घेत सर्वांशी समन्वय साधत काम करण्याची भूमिका श्री. कच्छवे यांनी व्यक्त केली.
स्वागत समारंभात सहाय्यक संचालक डॉ. श्याम टरके, अशोक माळगे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झेरीकुंठे, मधुकर चलमले, काकासाहेब गुंटे, विठ्ठलराव राऊत, खंडेराव देडे, पंकज जैयस्वाल, प्रभाकर शिरूरे, धोंडीराम ढगे, चंद्रकांत इंद्राळे, अशोक कुलकर्णी, रंगनाथ सगर, दिलीप मुनाळे, राजाभाऊ जाधव यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी श्री. सुनील कच्छवे यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करत विभागीय माहिती कार्यालय आणि पत्रकार यांच्यात अधिक सुसंवाद, विश्वास आणि सहकार्याचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर