कुष्ठधाम परिसरात अवैध गांजा विक्रीवर छापा, ५२,५०० किमतीचा २ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
कुष्ठधाम परिसरात अवैध गांजा विक्रीवर छापा, ५२,५०० किमतीचा २ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
लातूर, दि.14 : लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी दि. १४ जुलै २०२६ रोजी लातूर शहरातील कुष्ठधाम परिसरात नियोजनबद्ध छापा टाकून अवैध गांजा जप्त करण्याची कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विक्रम विनायक देडे (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. कुष्ठधाम, लातूर) हा स्वतःच्या घरासमोर अवैधरित्या गांजाची विक्री करीत आहे. सदर माहितीची खात्री करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छापा टाकण्यात आला. नायब तहसीलदार, वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी, अंगुली मुद्रा विभागाचा व्हिडिओग्राफर आणि राज्य परिवहन महामंडळाचे दोन शासकीय पंच यांना पाचारण करण्यात आले. संपूर्ण कारवाई व्हिडिओ चित्रीकरणासह पारदर्शक पद्धतीने करण्यात आली.
दुपारी सुमारे २.२० वाजता कुष्ठधाम, सारोळा रोड परिसरातील संशयिताच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच संशयित विक्रम देडे याने हातातील पांढऱ्या रंगाची पिशवी खाली टाकून घराच्या मागील बाजूने पळ काढला. पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये २ किलो १०० ग्रॅम वजनाचा बि-मिश्रित गांजा आढळून आला त्याची अंदाजे किंमत ५२,५०० असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी विक्रम विनायक देडे याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलीसांकडून कसून शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली, पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव जगताप, पोलीस अमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रसूल पठाण, रियाज सौदागर, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, मनोज खोसे, सचिन धारेकर , सुहास जाधव, गोविंद भोसले, प्रेम राठोड , बंडू नीटुरे, महिला पोलीस अमलदार सुरेखा मदने यांनी पार पाडली.
लातूर पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा सेवनाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलीसांना कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. अंमली पदार्थमुक्त लातूरसाठी नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे.