NEET Re-Exam शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची मोठी मोहीम
नीट यूजी पुनर्परीक्षा" सुरळीत, पारदर्शक व निर्विघ्न पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांची कठोर व प्रभावी उपाययोजना
लातूर, दि.१७:- देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेली नीट यूजी पुनर्परीक्षा (Re-NEET) दिनांक २१ जून २०२६ रोजी पार पडत आहे. परीक्षेची पारदर्शकता, गोपनीयता आणि विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेपूर्वी सर्व बंदोबस्त अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी, संपर्क अधिकारी, केंद्र अधीक्षक, वाहतूक नियंत्रण अधिकारी, एस्कॉर्ट पथके तसेच परीक्षा केंद्रांवरील समन्वय अधिकारी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व, संवेदनशीलता आणि जबाबदारी अधोरेखित करत प्रत्येक अधिकाऱ्याने अत्यंत सतर्कतेने कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व गोपनीय साहित्याच्या वाहतुकीसाठी विशेष पोलीस एस्कॉर्टची नियुक्ती करण्यात आली असून साहित्याच्या सुरक्षित हालचालीवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. परीक्षा केंद्र परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रांच्या परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गस्त पथके कार्यरत असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांजवळील गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
बंदोबस्तात सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान मोबाईल अथवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून त्याऐवजी प्रभावी संपर्कासाठी वॉकी-टॉकी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, परीक्षेच्या प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. लातूर जिल्हा पोलीस दल विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या या राष्ट्रीय कर्तव्यात पूर्ण जबाबदारीने सहभागी झाले असून नीट यूजी पुनर्परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पडण्यासाठी लातूर पोलीस यंत्रणा सज्ज आहे.