रेणापूर पोलिसांची कामगिरी : घरफोडी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस; ६ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी जेरबंद

रेणापूर पोलिसांची कामगिरी : घरफोडी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस; ६ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी जेरबंद

        लातूर, दि.०९:  लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल सातत्याने प्रभावी कारवाई करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून रेणापूर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे घरफोडी चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीस गेलेला ६ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेणापूर पोलीस ठाण्यात गुरनं. २६४/२०२६ कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख जियाउद्दीन वलीयोद्दीन (वय ५५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. सराया गल्ली, रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील आकाड्यावर असलेल्या पत्र्याच्या खोलीत ठेवलेली विविध साहित्ये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.
दि. ०३ जून २०२६ रोजी रात्री १०.०० वाजल्यापासून ते दि. ०४ जून २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या शेतात प्रवेश केला. तेथील पत्र्याच्या खोलीतील  लोखंडी बॉक्स तसेच मोठ्या प्रमाणात लोखंडी अँगल असा माल चोरून नेला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या निर्देशांवर पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील माहिती संकलित करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची हालचाल शोधून काढली.
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी चोरीचा माल विक्री करण्यासाठी पिंपळफाटा, रेणापूर येथील एका हॉटेलसमोरील भंगार दुकान परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत
१) प्रविण प्रकाश आडे (वय २२ वर्षे), 
२) सुरज विनायक चव्हाण (वय १९ वर्षे), 
३) विजय सुरेश चव्हाण (वय २१ वर्षे) 
४) एक विधीसंघर्षग्रस्त बालक
    
       यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये १ एचपी पाण्याची मोटार, वॉशिंग मशीन, लोखंडी बॉक्स, सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १० लोखंडी अँगल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन यांचा समावेश आहे. एकूण ६ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
              ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिघे पोलीस अंमलदार विपिन मामडगे, परमेश्वरशेळगे पंडगे, अनंतवाड यांनी केली आहे

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर