लातूर जिल्ह्यात जुगार-मटक्यावर पोलिसांचा मोठा दणका; १८ आरोपींविरुद्ध कारवाई, ४ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

लातूर जिल्ह्यात जुगार-मटक्यावर पोलिसांचा मोठा दणका; १८ आरोपींविरुद्ध कारवाई, ४ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
           लातूर, दि. १४ : लातूर जिल्ह्यात अवैध मटका आणि जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत १८ आरोपींना जेरबंद केले असून, तब्बल ४ लाख ६ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्राचे प्रमुख शाहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही धडक कारवाई केली.
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी नांदेड येथून विशेष पथक रवाना करून कारवाईचे आदेश दिले. या पथकाने १३ जून २०२६ रोजी औसा शहर आणि चाकूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करत अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला.
औसा शहरातील कारवाईदरम्यान पोलिसांनी मटका व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकून ४३ हजार १६० रुपयांची रोख रक्कम, पाच मोबाईल फोन आणि ७० हजार ८०० रुपयांचे इतर साहित्य असा एकूण १ लाख ६२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध औसा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर पथकाने चाकूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ३२ हजार ९१० रुपयांची रोख रक्कम, नऊ मोबाईल फोन आणि चार मोटारसायकलींसह २ लाख ४३ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातही नऊ आरोपींविरुद्ध चाकूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १८ आरोपींविरुद्ध कारवाई करत ४ लाख ६ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध जुगार आणि मटका व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक करत जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, नागरिकांनीही अशा अवैध धंद्यांविषयी माहिती पुढे येऊन पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी 'खबर' हेल्पलाईन क्रमांक ९१ ५० १०० १०० सुरू केला असून, या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे माहिती देता येणार आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जुगार आणि मटका यांसारख्या अवैध व्यवसायांमुळे सामाजिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याने अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा कायम राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर