४२ वर्षांची मैत्री, ३७ वर्षांची सेवा आणि जपलेली माणुसकीची नाती : "आबा"


४२ वर्षांची मैत्री, ३७ वर्षांची सेवा आणि जपलेली माणुसकीची नाती : "आबा" 
        शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक शिक्षक आपल्या ज्ञानदानातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितात; मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की ती केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही सर्वांच्या मनात कायमचे घर करून राहतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ताडगाव (ता. कळंब) येथून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक कैलास मारुती कांबळे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. तब्बल ३७ वर्षांची शैक्षणिक सेवा पूर्ण करून त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली असली तरी त्यांच्या कार्याचा आणि जपलेल्या नात्यांचा ठेवा कायम स्मरणात राहणारा आहे.
मूळचे उमरगा तालुक्यातील दस्तापूर येथील रहिवासी असलेल्या कैलास कांबळे यांची बालपणातील परिस्थिती अत्यंत बेताची होती. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. कै. माजी आमदार आलुरे गुरुजी यांचे संस्कार आणि मार्गदर्शन त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरले. अणदूर येथील जवाहर विद्यालयात शिक्षण घेत असताना महात्मा बसवेश्वर बोर्डिंगमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था होती. त्या काळातील संघर्ष, शिस्त आणि संस्कार यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी दिशा दिली.
जवाहर विद्यालय, अणदूर ही संस्था केवळ शिक्षण देणारी नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजविणारी म्हणून ओळखली जाते. तेथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेले प्रयत्न आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत इ, फ आणि ग तुकडीत शिक्षण घेत असतानाही कैलास कांबळे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली आणि पुढे सहशिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याबरोबरच समाजाशी सुसंवाद आणि स्नेह जपण्याचे कार्य केले. शाळा, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. त्यांचा साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वांना आपलेसे करण्याची वृत्ती यामुळे ते अनेकांच्या मनातील "आबा" बनले.
विशेष म्हणजे, ४२ वर्षांची मैत्री आणि परिवारासह जपलेली आत्मीय नाती हे त्यांच्या आयुष्याचे मोठे यश मानावे लागेल. मित्रपरिवारासोबतचे जिव्हाळ्याचे संबंध आजही तितक्याच दृढतेने टिकून आहेत. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यात मित्र, सहकारी, कुटुंबीय आणि हितचिंतकांनी त्यांचा भावपूर्ण सत्कार करून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली.
सेवा संपते, पण कार्याचा ठसा कायम राहतो. कैलास कांबळे यांनी शिक्षण, संस्कार आणि माणुसकीची जी शिदोरी समाजाला दिली, ती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी निर्माण केलेला स्नेह, विश्वास आणि आदर यांचा वारसा कायम स्मरणात राहील.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर