अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहानिमित्त उमरगा व तुळजापूर येथे व्यसनमुक्तीची शपथ; ३१८ जणांचा सहभाग

Writing
अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहानिमित्त उमरगा व तुळजापूर येथे व्यसनमुक्तीची शपथ; ३१८ जणांचा सहभाग
           धाराशिव, दि.२४ (प्रतिनिधी) : अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर उमरगा आणि तुळजापूर तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे धाराशिव जिल्हा संघटक, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त श्री. मारुती बनसोडे यांनी व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करून शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
उमरगा येथील पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. मारुती बनसोडे यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत चिंता व्यक्त केली. व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे होणारे नुकसान स्पष्ट करत त्यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात ११८ पुरुष व १८ महिला अशा एकूण १३६ जणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी विस्तार अधिकारी संजय राऊत, के. बी. भांगे, किशोर औरादे, तसेच पंचायत समिती उमरगा येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रवीण प्रशिक्षक सत्यवती इंगळे व संगीता राऊत यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेत नशामुक्त भारत अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग धाराशिव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात श्री. मारुती बनसोडे यांनी सुमारे २०० विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, ड्रग्स यांसारख्या घातक व्यसनांमुळे युवकांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसान कसे होते याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनी शिक्षण, संस्कार आणि निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून व्यसनांपासून दूर राहण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी-कदम होत्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही कार्यक्रमांमधून एकूण ३१८ जणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. समाजातील विविध घटकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रभावी ठरत असून युवक व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यास मोठी मदत होत असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर