शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; ०५ गुन्ह्यांची उकल करून २ लाख १० हजार रुपयांच्या सहा मोटारसायकली जप्त, एक आरोपी जेरबंद
शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; ०५ गुन्ह्यांची उकल करून २ लाख १० हजार रुपयांच्या सहा मोटारसायकली जप्त, एक आरोपी जेरबंद
लातूर, दि.23:- लातूर जिल्ह्यातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहनचोरीच्या पाच गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत सतीश सुभाष कदम (वय ३४ वर्षे, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
लातूर शहर व परिसरात घडलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ हालचाली करून संशयित आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली.
तपासादरम्यान आरोपीकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक तसेच आंध्र प्रदेश राज्यातील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त वाहनांची एकूण किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये आहे.
या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.
सदर कारवाई समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनात संतोष पाटील, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय फुलारी, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी केली आहे.