स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : ३ लाख १८ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध सुरू
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : ३ लाख १८ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध सुरू
लातूर, दि.१९:- पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलीस दलाने उघडलेल्या मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कारवाईत १२ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त करत दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे बाजारभावानुसार किंमत ३ लाख १८ हजार ५०० रुपये इतकी असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
लातूर जिल्ह्यातील अमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक अवैध धंद्यांची माहिती संकलित करण्यासाठी शहर परिसरात गस्त घालत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सारोळा चौकाजवळील रिंगरोडवर दोन व्यक्ती प्रतिबंधित गांजाची विक्री व्यवसाय करण्यासाठी थांबलेले आहेत अशी माहिती मिळाली वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बावकर यांच्या नेतृत्वात व नायब तहसीलदार, राज्य परिवहन महामंडळातील शासकीय पंच, वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी तसेच व्हिडिओग्राफीसाठी अंगुली मुद्रा विभागातील अधिकाऱ्यानी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सारोळा चौक परिसरात सापळा रचून संशयितांवर छापा टाकण्यात आला. पोलीस पथकाने दोन इसमांना त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यासह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे
१) कैलास शेषेराव जोगेश्वरी (वय २५ वर्षे)
२) सतीश नामदेव सूर्यवंशी (वय ४५ वर्षे), दोघेही रा. कुष्ठधाम, सारोळा रोड, लातूर अशी सांगितली.
त्यांची आणि त्यांच्या ताब्यातील पोत्याची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान पोत्यामध्ये हिरवट-काळसर रंगाचा, तीव्र वास असलेला बि-मिश्रित गांजा आढळून आला. सदर गांजाचे एकूण वजन १२ किलो ७४० ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले.
प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपींनी हा गांजा भूम (जिल्हा धाराशिव) येथील शेषेराव जाधव नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे आता अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे आरोपी कैलास शेषेराव जोगेश्वरी व सतीश नामदेव सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस कायदा) कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक, लातूर श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, रियाज सौदागर, प्रवीण कोळसुरे, राजेश कंचे, अर्जुन रजपूत, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, आनंद हल्लाळे, शैलेश सुडे, रामदास बाचीफळे, हरी पतंगे, व्यंकटेश नीटुरे यांनी पार पाडली.