पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची लातूर-हिंगोलीत धडक कारवाई
पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची लातूर-हिंगोलीत धडक कारवाई
अवैध जुगार अड्ड्यांवर छापे; अवैध वाळू उपसा प्रकरणात 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त
लातूर, दि. 4 जून 2026 : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर व हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात आली. अहमदपूर येथे सुरू असलेल्या मटका-जुगार अड्ड्यांवर छापे टाकून रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आले, तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 25 लाख 93 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस पथकाने 3 जून रोजी अहमदपूर येथील भाजी मार्केट परिसरातील भारत फ्रूट कंपनीजवळ सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकला. यामध्ये 17 हजार 890 रुपये रोख व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन अहमदपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर बसस्थानकाजवळील रोडगे यांच्या दुकानात सुरू असलेल्या ‘तितली भवर’ नावाच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. येथे 13 हजार 810 रुपये रोख व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणीही महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने चिमनगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात धाड टाकली. या कारवाईत तीन हायवा, दोन जेसीबी मशीन, एक ट्रॅक्टर आणि नदीपात्रातून काढून ठेवलेली दहा ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी 25 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र जमीन महसूल कायदा तसेच खाण व खनिज (नियमन व विकास) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसगोळे, संजीव जिकलवाड, गणेश धुमाळ आणि नामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी नागरिकांना अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘खबर’ हेल्पलाईन (91 50 100 100) वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.