सेवापूर्ती गौरव सोहळ्यात मुख्याध्यापक कैलास कांबळे यांचा भावपूर्ण सत्कार
सेवापूर्ती गौरव सोहळ्यात मुख्याध्यापक कैलास कांबळे यांचा भावपूर्ण सत्कार
मैत्री ही केवळ ओळख नसून विश्वास, आपुलकीचं नातं : मारूती बनसोडे यांचे प्रतिपादन
लातूर, दि. ०२ (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ताडगाव ता. कळंब येथील मुख्याध्यापक मा. श्री. कैलास मारुती कांबळे यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल ३० वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवलिंग पटवे साहेब उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, सहसंचालक तथा विभागीय अध्यक्ष नागपूर, श्री. कल्याणराव सोनवणे निवृत्त गटशिक्षणाधिकारी, श्री. मदने साहेब यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्री. कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कैलास कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. एक आदर्श शिक्षक, कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे वक्त्यांनी सांगितले. त्यांच्या सेवाकाळात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात सामाजिक परिवर्तन संस्था, नळदुर्गचे संस्थापक अध्यक्ष मारुती बनसोडे यांनी कैलास कांबळे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या मैत्रीबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, मैत्री ही केवळ ओळख नसून विश्वास, आपुलकी आणि परस्पर सहकार्याची भावना आहे. कैलास कांबळे यांनी आयुष्यभर जपलेले मैत्रीचे नाते अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ४२ वर्षांपासून जपलेली वर्गमित्रांची मैत्री. यावेळी वर्गमित्र पितांबर गवळी, मारुती बनसोडे, माजी पोलीस कर्मचारी पवार सर, माजी सैनिक कुमार मोरे, संपादक खंडेराव देडे, हरीलाल लोंढे, सहशिक्षक डावरे सर तसेच मुख्याध्यापक राम बनसोडे यांनी उपस्थित राहून आपल्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनातील प्रसंग, संघर्ष आणि यशस्वी वाटचालीच्या आठवणींनी वातावरण भावनिक झाले.
अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून कैलास कांबळे यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाचा उल्लेख केला. शिक्षक म्हणून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली असून त्यांचे योगदान समाज कायम स्मरणात ठेवेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने बोलताना कैलास कांबळे यांनी आपल्या सहकारी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि मित्रपरिवाराचे आभार मानले. सेवाकाळात मिळालेल्या सहकार्यामुळेच आपण यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडू शकलो, असे त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रातील अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि संस्कार देणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगलावे यांनी उत्कृष्टपणे केले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शेवटी उपस्थित मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या शुभेच्छांमध्ये हा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
शिक्षण क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल मुख्याध्यापक कैलास मारुती कांबळे यांना उपस्थितांनी भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.