लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम. एप्रिल महिन्यात ३३५ गुन्हे दाखल; ०१ कोटी ०९ लाख ५४ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम. एप्रिल महिन्यात ३३५ गुन्हे दाखल; ०१ कोटी ०९ लाख ५४ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर, दि.07:- समाजातील शांतता, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जिल्ह्यात लपूनछपून सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावी व कठोर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यांविरोधात ठोस आणि परिणामकारक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून या आदेशांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाकडून दिनांक ०१ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात एकाचवेळी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाया करण्यात आल्या. या विशेष मोहिमेदरम्यान अवैध देशी व विदेशी दारू, जुगार मटका, गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. लातूर पोलिसांनी एप्रिल महिन्यात
१)देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या २६३ व्यक्तीविरुद्ध २५७ गुन्हे दाखल करून १२,८१,७८५/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
२) जुगार मटका खेळणाऱ्या खेळणाऱ्या 121 लोकाविरुद्ध कारवाई करून 77 गुन्हे दाखल करण्यात आले तसेच जुगाराची साहित्य व रोख रक्कम असा एकूण २९,८३,९६०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
३) प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक विक्री व्यवसाय साठवणूक करणाऱ्या २५ आरोपी विरुद्ध २१ गुन्हे दाखल करून ६६ लाख ८८ हजार ३४५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान तंबाखू जप्त करण्यात आली आहे.
एकंदरीत एप्रिल महिन्यामध्ये ४०९ व्यक्तींविरुद्ध ३३५ गुन्हे दाखल करून रु. १,०९,५४,०९०/- किमतीचा देशी-विदेशी दारू, जुगार, प्रतिबंधित गुटखा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच संपूर्ण लातूर जिल्ह्यात धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या १७ जनाविरुद्ध शस्त्र अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध प्रकारचे १७ शस्त्र, व एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
एकंदरीत अवैध धंद्यावरील दाखल गुन्ह्यातील आरोपी पुन्हा अवैध धंद्यांमध्ये सहभागी होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पुन्हा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले की, “लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व समाजातील सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने व अधिक तीव्रतेने सुरू राहतील.” लातूर जिल्हा पोलीस दलाची ही कारवाई अवैध धंदे करणाऱ्यांसाठी कडक इशारा असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे.