औराद शहाजनी येथील अपहरण प्रकरणाचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी केली युवकाची सुखरूप सुटका ; दोन आरोपी जेरबंद, तिघांचा शोध सुरू

औराद शहाजनी येथील अपहरण प्रकरणाचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी केली युवकाची सुखरूप सुटका ; दोन आरोपी जेरबंद, तिघांचा शोध सुरू

       लातूर, दि.26:-  लातूर जिल्हा पोलिसांच्या सतर्कता, समन्वय आणि धाडसी कारवाईमुळे औराद शहाजानी परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या एका युवकाची अवघ्या काही तासांत सुखरूप सुटका करण्यात आली असून या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील समन्वय, नाकाबंदी आणि पोलिसांच्या तत्पर पाठलागामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.
                दि. 25 मे 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर हे पोलीस ठाणे औराद शहाजानी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, मौजे तगरखेडा येथील पुलाजवळून एका युवकाचे काही अज्ञात इसमांनी अपहरण केले आहे. सदर माहिती मिळताच सपोनि बांगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांकडून माहिती घेतली असता, चार ते पाच इसमांनी एका युवकास जबरदस्तीने कारमध्ये बसवून लातूरच्या दिशेने नेल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि बांगर यांनी संबंधित वाहनाचा क्रमांक मिळवून तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाणे निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी तसेच निटूर परिसरातील पोलिसांना सतर्क करण्यात आले व संबंधित मार्गांवर नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
                   दरम्यान, अपहरणकर्त्यांची कार निटूर मार्गे लातूरकडे जात असल्याचे स्पष्ट होताच निटूर येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार सुधीर शिंदे यांच्याशी संपर्क साधून संबंधित वाहनावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. काही वेळातच सुधीर शिंदे यांना संशयित वाहन दिसून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत खाजगी वाहनाच्या सहाय्याने आरोपींच्या कारचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग सुरू असल्याचे आरोपींच्या लक्षात येताच त्यांनी पानचिंचोली परिसरात वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून अपहरण केलेल्या युवकास कारमध्येच सोडून उसाच्या शेतात पळ काढला. काही वेळातच सपोनि बांगर व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपहरण करण्यात आलेल्या युवकाची सुखरूप सुटका करून संबंधित वाहन ताब्यात घेतले. यानंतर पळून गेलेले आरोपी रस्त्यावर येऊन लातूरकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभे असताना औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या पथकाने व पानचिंचोली येथील सतर्क ग्रामस्थांच्या मदतीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. 
१) सद्दाम मुस्ताक फारुकी, वय 36 वर्षे, रा. बाभळगाव रोड, लातूर 

२)वाजिद हक्कानी उर्फ हकानी शेख, रा. बरकत नगर, लातूर 

             यांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणात पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे गुरनं 115/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 140(1), 109(1), 126(2), 115(2), 189(2), 189(4), 190, 191(3) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 25 प्रमाणे 
फिर्यादी मोईन अकबर चौधरी (वय 25 वर्षे, रा. अंजली नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सद्दाम मुस्ताक फारुकी, राहुल चंद्रकांत वाघमारे, वाजिद हक्कानी उर्फ हकानी शेख, अलीम कलीम शेख व सचिन वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                  प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपींनी कट रचून फिर्यादीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी फिर्यादीची दुचाकी अडवून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले व जबरदस्तीने कारमध्ये टाकून त्याचे अपहरण केले असल्याचे तपासात समोर आले आहे.
               या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर, पोलीस अंमलदार सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कदम, पप्पू कांबळे तसेच औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे इतर अधिकारी व अमलदारांनी तसेच पानचिंचोली येथील ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर हे करीत आहेत.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर