किनगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा!
किनगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा!
अहमदपूर, दि. 23:- नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमेला वेग आला असून, पोलिस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील किनगाव परिसरात मोठी कारवाई केली आहे.
किनगाव पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रोख रकमेसह तब्बल ८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मे महिन्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान आतापर्यंत जुगार, मटका, अवैध दारू, वाळू उपसा आणि गांजा विक्रीसंदर्भात एकूण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६६ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व कारवाईत मिळून ६३ लाख ९२ हजार रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाईन क्रमांक 91 50 100 100 वर देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.