परिवर्तन सामाजिक संस्थेला ‘समाज भूषण’ पुरस्कार; सावरगावात आंबेडकरी शाहिरांचा मेळावा उत्साहात

 परिवर्तन सामाजिक संस्थेला ‘समाज भूषण’ पुरस्कार; सावरगावात आंबेडकरी शाहिरांचा मेळावा उत्साहात
        सावरगाव, ता. तुळजापूर, दि. ३ मे २०२६ — डॉ. आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट, आळजापूर (ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि पंचशील तरुण मंडळ, सावरगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात परिवर्तन सामाजिक संस्था, बोरगाव/नळदुर्ग (ता. तुळजापूर) यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावरगाव येथे पार पडलेल्या या सोहळ्याला आंबेडकरी शाहिरांचा मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत लाभली.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते परिवर्तन सामाजिक संस्थेचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सामाजिक क्षेत्रात संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात तुळजापूर, बार्शी आणि धाराशिव तालुक्यांतील अनेक गायक, शाहीर आणि कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबेडकरी विचारांची गाणी, काव्य आणि शाहिरी सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. समाजजागृतीचा संदेश देत या मेळाव्याने उपस्थितांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. बाबासाहेब बडवे, हरीश फटके, दिलीप फडके आणि हणमंत फडके यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच ॲड. राम ढवळे, गायक जीवन शिंदे, प्रा. डॉ. दुष्यंत कठारे, सचिन सोनवणे, निलेश वाघमारे आदी मान्यवरांचीही या वेळी उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकी जपत आणि आंबेडकरी विचारांची जोपासना करत अशा कार्यक्रमांमधून परिवर्तन सामाजिक संस्थेसारख्या संस्थांना मिळणारा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर