गुन्हेगारांना न्यायालयाचा दणका; लातूर पोलिसांच्या भक्कम तपासामुळे दोन मारहाण प्रकरणांतील सहा आरोपींना शिक्षा


गुन्हेगारांना न्यायालयाचा दणका; लातूर पोलिसांच्या भक्कम तपासामुळे दोन मारहाण प्रकरणांतील सहा आरोपींना शिक्षा
 
       लातूर, दि.20:-  तंत्रशुद्ध, निष्पक्ष व पुराव्यावर आधारित तपासकार्या मुळे कासार शिरशी पोलीस ठाण्याने तपास केलेल्या दोन स्वतंत्र मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी प्रकरणांमध्ये मा. न्यायालयाने एकूण सहा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. सदर दोन्ही प्रकरणांची सुनावणी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, निलंगा येथे मा. न्यायाधीश श्रीमती गुंजवटे यांच्या न्यायालयात सुरू होती. दोन्ही प्रकरणांमध्ये सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल, तपासातील सुसंगती व सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले.
पहिल्या प्रकरणात पोलीस स्टेशन कासार सिरशी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 151/2019 अन्वये भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मेघा जनार्धन फुले, रा. बोळेगाव ता. निलंगा जि. लातूर या घरी असताना आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन बांधाच्या कारणावरून वाद घालत संगनमताने मारहाण केली. आरोपी जयाबाई जयवंत फुले यांनी फिर्यादीस चावा घेऊन जखमी केले, तर आरोपी लक्ष्मण जयवंत फुले यांनी काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी 
1) जयाबाई जयवंत फुले
 2) लक्ष्मण जयवंत फुले 
3) सोनाली लक्ष्मण फुले यांना दोषी ठरवत न्यायालयाने भादंवि कलम 324 अन्वये प्रत्येकी दोन महिने साधी कैद व तीन हजार रुपये दंड, कलम 323 अन्वये प्रत्येकी दोन महिने साधी कैद व एक हजार रुपये दंड तसेच कलम 504 अन्वये प्रत्येकी एक महिना साधी कैद व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
                  दुसऱ्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक 168/2016 अन्वये भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आतिक युसुफ कालचीवे हे शेताकडे पायी जात असताना आरोपी मोटारसायकलवरून त्यांच्या पाठीमागून आले. जागेच्या व्यवहारासंदर्भात तक्रार का केली या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मोटारसायकलवरील टिकाव काढून त्याच्या तुंब्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात आरोपी 
1) मोहसीन बब्रू कालचीवे
 2) सत्तार मैनुद्दीन कालचीवे 
 3) रुकूम चांद कालचीवे यांना दोषी ठरवत न्यायालयाने भादंवि कलम 324 अन्वये प्रत्येकी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, कलम 323 अन्वये प्रत्येकी एक महिना साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड तसेच कलम 504 अन्वये प्रत्येकी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
                सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रदीप जाधव तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर चव्हाण यांनी अत्यंत बारकाईने व तंत्रशुद्ध पद्धतीने पूर्ण केला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळ पंचनामे व इतर तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकील श्री. व्ही. एन. म्हेत्रे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट अंमलदार व पैरवी अंमलदार एन. एन. बेडदे, समीर कोरबू, विकास मुगळे यांनी दोन्ही प्रकरणांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यासाठी विशेष मेहनत घेतली.
             लातूर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक गुन्ह्याचा निष्पक्ष, वेगवान व पुराव्यावर आधारित तपास केला जात आहे. सामाजिक शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने दक्ष आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर