लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा घणाघात; ७ लाख ४२ हजार रुपयांचा तब्बल २४ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त, एक आरोपी जेरबंद


‎             
लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा घणाघात; ७ लाख ४२ हजार रुपयांचा तब्बल २४ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त, एक आरोपी जेरबंद
‎   लातूर, दि.19:- लातूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत तब्बल ७ लाख ४२ हजार २०० रुपये किंमतीचा २४ किलो ७४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, एका आरोपीस रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. 
‎                 पोलीस अधीक्षक, लातूर श्री अमोल तांबे यांनी  अवैध धंदे, गांजा विक्री, मादक पदार्थांची विक्री,वाहतूक व साठवण करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली  पथके सक्रिय करण्यात आली आहेत.
‎                    दि. १८ मे २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख हे आपल्या पथकासह उदगीर शहर परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, उदगीर येथील मोंढा रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या “साईनाथ मिर्च मसाला उद्योग” या दुकानामध्ये एक इसम मोठ्या प्रमाणात गांजाची साठवण करून अवैध विक्री करीत आहे.
‎                पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांनी तात्काळ सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर तसेच उदगीर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाईचे नियोजन करण्यात आले.
‎               नायब तहसीलदार, दोन शासकीय पंच, प्रमाणित वजन काटा धारक, फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी, व्हिडिओग्राफर यांना सोबत घेऊन सर्व अधिकारी, पंच व कर्मचारी यांनी नियोजनबद्धरीत्या सायंकाळी सुमारे ५.४० वा.च्या दरम्यान पोलिसांनी “साईनाथ मिर्च मसाला उद्योग” येथे छापा टाकला. दुकानाची झडती घेतली असता दुकानाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये हिरवट-काळसर रंगाचा व उग्र वास येणारा बि-मिश्रित सुका गांजाचा मोठा साठा आढळून आला.
‎              दुकानात उपस्थित असलेल्या इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव

‎१) शुभरत्न ऊर्फ कपील बाबुराव गायकवाड, वय १९ वर्षे, रा. फुले नगर, उदगीर जि. लातूर 
‎                    असे सांगितले. पंच व पोलीस पथकाने ‎सदर पोत्यामधील पदार्थाची पाहणी केली असता तो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचे वजन केले असता सदर गांजाचे एकूण वजन २४ किलो ७४० ग्रॅम इतके भरले. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल ७ लाख ४२ हजार २०० रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.
‎                 आरोपी शुभरत्न ऊर्फ कपील गायकवाड हा सदर गांजा अवैध विक्री व्यवसायासाठी साठवून ठेवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने गांजा कोठून आणण्यात आला, त्याचे इतर साथीदार कोण आहेत, याबाबत सखोल तपास सुरू आहे.
‎                   या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
‎                 सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर, पोलीस निरीक्षक श्री अशोक अनंत्रे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, सचिन धारेकर, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे तसेच उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार हारणे, पवार, गवळी यांनी संयुक्तपणे पार पाडली.
‎               लातूर पोलीस दलाकडून समाजविघातक प्रवृत्ती, अंमली पदार्थ विक्रेते व युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध धंद्यांविरोधातील कार्यवाही यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांपासून दूर राहावे तसेच अशा अवैध धंद्यांबाबत माहिती असल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे, असे आवाहन देखील पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर