दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद ०३ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


 दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद ०३ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

      लातूर, दि.17:-  लातूर जिल्ह्यात दिवसाढवळ्या घरफोडी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३८ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे निलंगा शहर परिसरातील सलग घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
                 लातूर जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमण्यात आले होते.
                  दि. १६ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  निलंगा परिसरात मालमत्तेविषयक गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत गस्त घालत होते.दरम्यान, हाडगा नाका, निलंगा येथे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निलंगा-औसा रोडवरील मीना निंबाळकर पेट्रोलपंपासमोर चोरीचे सोन्याचे दागिने घेऊन एक संशयित इसम थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्यास ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव 
१) राजु ऊर्फ राजाराम कुंडलीक म्हेत्रे, वय २९ वर्षे, रा. शिवाजीनगर, निलंगा, जि. लातूर.
                असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने निलंगा शहरातील विविध भागात दिवसाढवळ्या घरांचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी गुन्हे अभिलेख तपासले असता पोस्टे निलंगा येथे गुरनं ९३/२०२६, ९४/२०२६ व १३७/२०२६ कलम ३०५(अ), ३३१(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध वजनांच्या सोन्याच्या अंगठ्या,सोन्याचे कानातील झुमके तसेच १० हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश असून एकूण ४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ३ लाख ३८ हजार १२५ रुपये इतकी आहे.
तपासादरम्यान आरोपीने निलंगा शहरातील आर्य समाज गल्ली, ब्राईट गिरीजा नगरी, दापका व शिवाजीनगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या करून सोन्याचे दागिने व रोकड चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून बंद घरांची रेकी करून घरमालक बाहेर गेल्यानंतर कुलूप तोडून चोरी करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

                  सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल पोस्टे निलंगा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निलंगा पोलीस करीत आहेत.
                  ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूरचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, गणेश साठे, तसेच सायबर सेलचे शैलेष सुडे यांनी पार पाडली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर