५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल व डुप्लिकेट सोन्याचे बिस्कीट जप्त; जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील ८ गुन्हे उघड

‎डुप्लिकेट सोने दाखवून फसवणूक व गर्दीतून पैसे चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात लातूर स्थानिक गुन्हे शाखेला यश
५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल व डुप्लिकेट सोन्याचे बिस्कीट जप्त; जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील ८ गुन्हे उघड

‎      लातूर, दि.23:-  लातूर जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे बनावट बिस्कीट विक्रीचा बहाणा करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी खिसेकापू व चोरी करणारे सराईत तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व बनावट सोन्याचे बिस्कीट असा एकूण ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
‎                श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. मंगेश चव्हाण,अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या आदेशानुसार,  पोउपनि श्री प्रमोद देशमुख यांचे पथक तपास करीत होते.
‎               दि. २२ मे २०२६ रोजी बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, औसा-लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात तीन इसम सोन्याचे डुप्लीकेट बिस्कीट विक्रीसाठी ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबले आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पथकाने घटनास्थळी छापा टाकून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे
‎१) बाबाराव सूर्यकांत जाधव (वय ३०)
‎२) केशव छगन जाधव (वय ५०) 
‎३) संदीप दगडू जाधव (वय २९) रा.  तिघे रा. सलगरा ता. जि. लातूर
‎                     अशी सांगितली.
‎त्यांची  झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मनी मंगळसूत्र, रोख रक्कम तसेच सोनेरी रंगाचे डुप्लीकेट बिस्कीट मिळून आले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी फसवणूक व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
‎                    आरोपींनी महिलांना “सोन्याचे बिस्कीट” देण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याचे सांगितले. तसेच बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या खिशातील व पिशवीतील रोख रक्कम चोरी केल्याचेही निष्पन्न झाले.
‎पोलिसांनी आरोपींकडून गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव व एमआयडीसी पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील एकूण १ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम, २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत  ३ लाख ३० हजार रुपये तसेच बनावट सोन्याचे बिस्कीट असा एकूण ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपी संदीप दगडू जाधव हा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर व चाकूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
‎               सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे हजर करण्यात आले आहे.
‎सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात श्री. अक्षय जाधव, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशिराम बरुरे, गोविंद भोसले, गाडेकर यांनी केली आहे.
‎                स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील फसवणूक व गर्दीतील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांनी देखील अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर