स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक; सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक; सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त
लातूर, दि.03:- लातूर जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे.
दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
1. सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर)
2. आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर)
झडती घेतली असता आरोपींकडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 06 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/2026 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे,सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.