आयपीएल क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या आरोपीस 7 लाखांहून अधिक मुद्देमालासह अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आयपीएल क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या आरोपीस 7 लाखांहून अधिक मुद्देमालासह अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर, दि.16:- लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, जुगार, सट्टा व गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येरोळ मोड येथे कारवाई करत आयपीएल क्रिकेट सामन्यावर मारुती स्वीफ्ट कारमध्ये बसून ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेत तब्बल 7 लाख 06 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ मोड येथील एका हॉटेलजवळ एक इसम मारुती स्वीफ्ट कारमध्ये बसून आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यावर पैसे लावून क्रिकेट सट्टा चालवत आहे.मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. रात्री सुमारे 10.50 वाजण्याच्या सुमारास संशयित मारुती सुझुकी स्वीफ्ट कार क्रमांक MH-55-B-0534 मध्ये आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव
१) तातेराव शिवाजी दंडीमे, वय 34 वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, निडेवन रोड, उदगीर
असे सांगितले. पोलिसांनी त्याची व वाहनाची झडती घेतली असता क्रिकेट सट्टा चालविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम व वाहन असा मुद्देमाल आढळून आला. या कारवाईत आरोपीकडून दोन Vivo कंपनीचे मोबाईल फोन, एक Acer कंपनीचा लॅपटॉप, मारुती सुझुकी स्वीफ्ट कार, रोख रक्कम, सट्ट्याच्या हिशोबासाठी वापरण्यात येणाऱ्या डायऱ्या व कॅल्क्युलेटर असा एकूण 7,06,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग स्वीकारत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणी आरोपी तातेराव शिवाजी दंडीमे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्री.प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार तुळशीराम बरुरे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, अंजली गायकवाड, पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळचे पोलीस अमलदार घाडगे, साठे यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, क्रिकेट सट्टा, ऑनलाईन जुगार व अवैध धंद्यांबाबत माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.