*वेतन वितरण प्रक्रियेत अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी अंती चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.*
*पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर*
*प्रेस नोट*
*दिनांक : 10 मे 2026*
*वेतन वितरण प्रक्रियेत अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी अंती चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.*
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे श्री गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर तथा चौकशी अधिकारी यांचे फिर्यादीवरून गुरन १९८/२०२६ कलम३१८(४),३१६(४),३१६(५),३३६(२),३३८,३३६(३),३४०(२),३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये आरोपी नामे लिपिक राहुल गोविंदराव वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय मारुती क्षिरसागर व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय दिगंबर सूर्यवंशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी मे २०१५ ते मार्च २०२५ या कालावधीत संगणमत करून अप्रमाणिकपणे शासनाचे रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड करून, बनावट दस्तऐवज तयार करून व त्याचा गैरवापर करून Incentive, Basic Arrears, Special Pay व इतर वेतन शीर्षकांखाली अनधिकृतरीत्या जास्तीची रक्कम अदा करून व जास्तीचे अदा केलेल्या रकमेतून स्वतः करिता स्वतःचे बँक खात्यावर रक्कम स्वीकारून २ कोटी ३८ लाख ९२ हजार ००७ इतक्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे.
सदर गुन्ह्यातील 03 आरोपींना तात्काळ अटक करून माननीय न्यायालय समक्ष हजर केले असता सदर आरोपींची माननीय न्यायालयाने दिनांक 16.05.2026 पावेतो तपासकामी पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निष्पक्ष व पारदर्शक तपास सुरू केला असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री समीरसिंह साळवे ,उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग लातूर शहर हे करीत आहेत.