लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक
लातूर, दि.१९:- लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक; पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय 17 वर्षे, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ते व त्यांचे मित्र महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी अंदाजे 2.00 वाजता घराकडे जात असताना, आरोपी अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर, लातूर) व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करून मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या हातातील अंदाजे 20,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले.
सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड यांनी पथक गठित करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. अत्यंत शिताफीने आरोपी
१) अजय दिलीप काळे
२) देवेंद्र शिवराम सलगर ( दोघे रा. कातपूर रोड, लातूर)
यांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 75,000/- रुपये) तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (किंमत अंदाजे 60,000/- रुपये) असा एकूण 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.