एक हेल्मेट, एक आयुष्य


 लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेच्या पोलीस सभासदांना पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हेल्मेट वाटप

   लातूर, दि.20:-   राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर  मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, व चार चाकी स्वारासाठी सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये लातूर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि अंमलदार दुचाकी वाहन चालविणाऱ्यांना हेल्मेट व चार चाकी वाहन चालवणारा सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. 
                लातूर पोलिसांच्या लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर यांनी लातूर पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा यासाठी पतसंस्थेचे सभासदांना हेल्मेट वाटप करण्याचा मानस पोलीस अधीक्षक यांना दाखविला. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या संमतीने लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेतील ठेवीदार व आर.डी. धारक सभासदांना मोफत आयएसआय (ISI) प्रमाणित हेल्मेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात सभासदांना हेल्मेट वाटप कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात 50 पोलीस अंमलदार/संस्थेचे सभासद ठेवीदार यांना हेल्मेट चे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे हस्ते वाटप करण्यात आले असून आणखीन दीड हजार पोलिसांना पतसंस्थेकडून हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. 
            
                 पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सदर कार्यक्रमादरम्यान सांगितले की, "उपलब्ध आकडेवारीनुसार, रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 80 टक्के मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होतात. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट हे डोक्याचे व मेंदूचे संरक्षण करणारे अत्यावश्यक साधन आहे. अपघाताच्या वेळी होणारा जोरदार आघात हेल्मेट शोषून घेत असल्यामुळे गंभीर दुखापती टाळल्या जातात आणि मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. त्यामुळे हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले."

            पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेले फ्रंटलाइन यंत्रणा असून, अनेकदा ड्युटीच्या धावपळीत स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळते. अनियमित कामाचे तास, ताणतणाव व सततची हालचाल यामुळे पोलीस कर्मचारीही अपघाताच्या जोखमीला सामोरे जातात. अशा घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने स्वतःपासून सुरुवात करून सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.
               या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री. परमेश्वर जनक ढेकणे, सचिव नामदेव सारोळे, गोविंद सरवदे, खुर्रम काझी माधव, माधव केंद्रे, आयुब शेख, नवनाथ कल्याने, श्रीमती दीपिका शिवलकर व अनुराधा मेहकर तसेच सभासद मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना नियमित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. 
               पतसंस्थेकडून पोलिसांच्या सुरक्षितेसाठी मोफत हेल्मेट वाटप करण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
                   या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक पोलीस अधिकारी व अमलदारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करणे हा आहे. “हेल्मेट ही आपत्ती नसून जीवाची ढाल आहे” हा संदेश देत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. लातूर पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ पोलीस कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर