लातूर पोलिसांची मोठी कारवाई; ३२ गुन्ह्यांतील कुख्यात आरोपी जेरबंद!
नमस्कार.नंदादीप वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
लातूर जिल्ह्यातील घरफोडीच्या मालिकेवर अखेर पोलिसांनी मोठा प्रहार करत ३२ गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला कुख्यात आरोपी जेरबंद केला आहे.
मागील दीड ते दोन वर्षांपासून लातूरसह धाराशिव, सोलापूर आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात घरफोडीच्या घटना सातत्याने घडत होत्या. बंद घरांचे कुलूप तोडून दागिने आणि रोख रक्कम चोरणारी ही टोळी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरली होती.
मात्र, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला आणि सुनिल उर्फ काळ्या शिंदे या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्याने विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे या टोळीने रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात अजून काही साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.