वैज्ञानिक दृष्टिकोन नसणाऱ्यांना संविधानिक पदावर राहण्यास अधिकार नाही : -एडवोकेट असीम सरोदे यांचे प्रतिपादन

वैज्ञानिक दृष्टिकोन नसणाऱ्यांना संविधानिक पदावर राहण्यास अधिकार नाही :
       -एडवोकेट असीम सरोदे यांचे प्रतिपादन
  लातूर, दि.४: - भारताच्या संविधानाने अंधश्रद्धा नाकरून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला आहे .देशाच्या प्रगतीसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे .परंतु आजचे सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी बुवा- बाबांच्या नादी लागून अंधश्रद्धा पसरवीत आहेत. संविधानाशी त्यांनी द्रोह केला आहे. त्यामुळे त्यांना संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही असे  सांगून त्यांना राष्ट्रपती अथवा राज्यपाल यांनी आपला अधिकार वापरून पदच्युत करावे असे आवाहनही सुप्रसिद्ध कायदेतज्ञ तथा  परिवर्तनवादी चळवळीचे भाष्यकार एडवोकेट असीम सरोदे यांनी केले आहे.   
     लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात मुख्याध्यापक राजकुमार नामवाड सेवागौरव समितीच्या वतीने वैचारिक साहित्याचे अभ्यासक प्रा .डॉ .अशोक नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्याख्यानात  एडवोकेट असीम सरोदे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले. मुख्याध्यापक राजकुमार नामवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच लातूर  शहर मनपाचे स्वीकृत नूतन नगरसेवक प्रा .डॉ. शिवाजीराव जवळगेकर यांचाही सत्कार करण्यात आला आणि 'प्रबोधयात्री' या वैचारिक ग्रंथाचे  मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
     तब्बल दीड तासभर बोलताना आपल्या अभ्यासपूर्ण आणि तर्काधिष्ठित भाषणात अडवोकेट सरोदे पुढे म्हणाले की, संविधानाचे संरक्षण  करण्याची जबाबदारी ज्या  ज्या सत्ताधारी लोकांवर असते त्यांनी संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यामुळे देशातील विचारवंत आणि  बुद्धिजीवी वर्ग अस्वस्थ असून भारतीय नागरिकांना जागृत करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत . परंतु त्यांनाही शहरी नक्षलवादी ठरवून तुरुंगात डांबले जात आहे .त्यामुळे आता भारताच्या सजग नागरिकांनीपुढे येऊन लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी आंदोलन केले पाहिजे. तरच लोकशाही आणि संविधान टिकेल असे सांगून सत्ताधाऱ्यांनी मालकत्वाची भूमिका सोडून पालकत्व स्वीकारावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी थोर इतिहास तज्ञ प्राचार्य डॉ .सोमनाथ रोडे यांचेही समायोचीत भाषण झाले.
    कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी केली प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब यांनी सन्मानपदाचे वाचन केले सूत्रसंचालन बालाजी कांबळे आणि नारायण कांबळे यांनी केले तर बालाजी साळुंखे यांनी आभार मानले या कार्यक्रमास जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री नरसिंग घोडके ,शिरीष  दिवेकर , एकनाथ पलमटे ,दत्ता माने ,संग्राम वाघमारे, व्यंकट सरोदे ,जगन्नाथ यमले, बालाजी सोनकांबळे यांनी विशेष  परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर