चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू




            लातूर, दि.19:- लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे.

              दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला.
                या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले.
                 
                   सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
                     लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर