लातूरसह चार जिल्ह्यांत,कर्नाटकात घरफोडी करणारी सराईत टोळीतील, ३२ गुन्ह्यांतील, कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद, लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश
*लातूरसह चार जिल्ह्यांत,कर्नाटकात घरफोडी करणारी सराईत टोळीतील, ३२ गुन्ह्यांतील, कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद, लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश
लातूर, दि.२५:- लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या.बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
मात्र, पोलीस अधीक्षक, अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे.
पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले . आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून –
५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.
तपासाअंती आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे
🔴 लातूर जिल्हा – २८ गुन्हे
भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे.
🔴 धाराशिव जिल्हा – ४ गुन्हे
🔴 सोलापूर जिल्हा – ५ गुन्हे
🔴 कर्नाटक राज्य (बिदर) – ३ गुन्हे
या प्रमाणे एकूण ३२ गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे.
या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.