बीएसएनएल कॉपर केबल चोरीचा प्रयत्न उधळला; गांधी चौक पोलिसांची कारवाई.चार आरोपी ताब्यात
बीएसएनएल कॉपर केबल चोरीचा प्रयत्न उधळला; गांधी चौक पोलिसांची कारवाई.चार आरोपी ताब्यात.
लातूर, दि.10- लातूर शहरातील गुळमार्केट ते गांधी चौक या मुख्य मार्गावर भूमिगत बीएसएनएल कॉपर केबल चोरी करण्याचा प्रकार गांधी चौक पोलिसांनी उधळून लावला असून, या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 00.20 वाजण्याच्या सुमारास गुळमार्केट ते गांधी चौक जाणाऱ्या रस्त्यावर, एका हार्डवेअर दुकानासमोर, जमिनीतून गेलेल्या बीएसएनएलच्या कॉपर केबल वायर खोदून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. सदरची माहिती गांधी चौक पोलिसांना प्राप्त झाली त्यावरून गांधी चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून कॉपर केबल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आरोपी साईराम सुब्बाराव (वय 25 वर्षे, रा. एलुरु, जि. विजयवाडा, राज्य आंध्रप्रदेश) याच्यासह इतर तीन महिलांनी संगनमत करून आरोपींनी कोणतेही यांत्रिक साधन किंवा वाहन न वापरता हाताने खोदकाम करून केबल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी सुहास रामलिंग स्वामी (वय 48 वर्षे, व्यवसाय – ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर, BSNL, रा. सेंट्रल हनुमान, लातूर) यांनी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे येऊन तक्रार दिल्यानंतर सदर प्रकरणी गु.र.नं. 208/2026 कलम 303(2), 62, 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दिनांक 10/04/2026 रोजी पहाटे 03.32 वाजता दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणताही माल चोरीला गेला नसून, पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे.पुढील तपास पोलीस हवालदार नराळे हे करीत आहेत.
संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलिस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, सचिन चंद्रपाटले, नागनाथ नराळे यांनी केली आहे.