रिक्षा भाडेवाढीच्या नावाखाली मनमानी; नियमांची पायमल्ली सुरूच

रिक्षा भाडेवाढीच्या नावाखाली मनमानी; नियमांची पायमल्ली सुरूच
     लातूर, दि.११ (प्रतिनिधी): गेल्या १२ वर्षांनंतर रिक्षा भाडेवाढ लागू करण्यात आली असली, तरी त्याच्या आडून सुरू असलेल्या नियमभंग आणि मनमानी कारभारावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “भाडेवाढ हवी, पण नियम पाळायचे नाहीत,” असा दुहेरी मापदंड रिक्षाचालकांकडून दिसत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
शहरात अनेक रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी अरेरावीने वागणे, दारूच्या नशेत वाहन चालवणे, अधिकृत युनिफॉर्म न घालणे, तसेच परवाना आणि बॅज न बाळगणे अशा गंभीर प्रकारांना उधाण आले आहे. इतकेच नव्हे, तर काही ठिकाणी अल्पवयीन चालक रिक्षा चालवत असल्याचे प्रकार उघडकीस येत असून, प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
“१० रुपये की १५ रुपये” या किमान भाड्याच्या चर्चेपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. नियमांचे उघडपणे उल्लंघन करून भाडेवाढीचा आग्रह धरणे म्हणजे सरळसरळ जनतेची फसवणूक असल्याची टीका होत आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) या प्रकारांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत गंभीर मानले जात आहे. नियमांची अंमलबजावणी करणे हीच जबाबदारी असताना, संबंधित यंत्रणा निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आता तरी प्रशासनाने झोपेतून जागे होऊन कडक कारवाई करावी, अन्यथा रिक्षा व्यवस्थेतील अराजकता आणखी वाढेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन आणि दोषींवर त्वरित कारवाई हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर