नांदेड परिक्षेत्रात चंदन तस्करीचा मोठा भांडाफोड; ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड परिक्षेत्रात चंदन तस्करीचा मोठा भांडाफोड; ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, दि. ५ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) – अवैध चंदन तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५२ लाखांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने नांदेड परिक्षेत्रात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरकडून मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरकडे चंदनाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ५ एप्रिल रोजी पहाटे नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिस ठाणे हद्दीत सापळा रचण्यात आला. संशयित आयशर वाहन अडवून तपासणी केली असता सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे भासवण्यात आले. मात्र सखोल तपासात वाहनाच्या बॉडीमध्ये लपवलेला गुप्त कप्पा आढळून आला.
या कप्प्यातून चंदनाने भरलेल्या गोण्या जप्त करण्यात आल्या. एकूण १,४७० किलो वजनाचे चंदन लाकूड, अंदाजे ३६.७५ लाख रुपये किमतीचे, तसेच वाहन व रोख रक्कम मिळून एकूण ५१.९६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी तुकाराम शेरखान बुंडाळे (वय ३३, रा. आनंदवाडी, ता. चाकूर), तौफिक चांदपाशा देशमुख (वय ४४, रा. चापोली), रामदास शेरखान बुंडाळे, बालासाहेब जाधव (रा. केज, जि. बीड) आणि शंकर तानाजी मानगावे उर्फ जाधव (रा. चाकूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय वन अधिनियम आणि वृक्षतोड अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास लोहा पोलिस करत आहेत.
या धाडसी कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खांडेकर, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कमाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी पोलिसांच्या ‘खबर’ हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.