नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम; ५ लाखांचा साठा जप्त

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम; ५ लाखांचा साठा जप्त
नांदेड, दि. १ एप्रिल २०२६ – नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून सुमारे ५ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ मार्चपासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इतवार पोलीस ठाण्याच्या पथकाने इस्लामपुरा भागातील एका घराच्या शेडमध्ये छापा टाकला. या कारवाईत ५,०३,७४० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर (रा. मदिना नगर, देगलूर नाका), शेख अमीर (रा. हिमायतनगर), शेख अजिम परभणीवाला (रा. परभणी) आणि बदर शेख अजिमोद्दीन अब्दुल हमीद (रा. मुझखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतवार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात संबंधित आरोपी गुटखा खरेदी, साठवणूक आणि वितरणासाठी संघटित पद्धतीने काम करत असल्याचे समोर आले आहे. ते परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून नांदेड व परभणी जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. गुटखा निर्मूलनासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर