नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; बनावट सुगंधित जर्दा कारखान्यावर छापा, जुगार अड्डाही उद्ध्वस्त — 7.37 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; बनावट सुगंधित जर्दा कारखान्यावर छापा, जुगार अड्डाही उद्ध्वस्त — 7.37 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, दि. 13 एप्रिल : पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट सुगंधित जर्दा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला असून, त्याचबरोबर देगलूर येथे सुरू असलेला जुगार अड्डाही उद्ध्वस्त केला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 7 लाख 37 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील इंदिरानगर परिसरात सय्यद जाकीर उर्फ बाबा गुलाम दस्तगीर (वय 40) हा बनावट सुगंधित जर्दा तयार करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत कारखान्यावर धाड घातली. या कारवाईत सुगंधित जर्दा, जर्दा बनविण्याचे साहित्य, मशीन, ग्लिसरीन व पॅकिंग साहित्य असा एकूण 3 लाख 44 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा कमी प्रतीच्या जर्दामध्ये रसायने मिसळून नामांकित कंपनीच्या नावाने विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, देगलूर तालुक्यातील कुडवाडी शिवारात सुरू असलेल्या ‘टिर्रट’ नावाच्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून 36 हजार 340 रुपये रोख, 8 मोबाईल फोन आणि 7 मोटारसायकली असा 3 लाख 93 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच देगलूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संयुक्त कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रवीण खानसोडे, संजीव निकमवाड, गणेश घुमाळ आणि कमानी गवळी यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती गोपनीय पद्धतीने पोलीस हेल्पलाईन क्रमांक 91 50 100 100 वर द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.