नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला मोठे यश; 71 गुन्हे दाखल, ₹1.19 कोटींचा मुद्देमाल जप्त


नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला मोठे यश; 71 गुन्हे दाखल, ₹1.19 कोटींचा मुद्देमाल जप्त
नांदेड, दि. 1 एप्रिल 2026 – नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिनांक 16 ते 31 मार्च 2026 या कालावधीत चाललेल्या या धडक कारवाईदरम्यान एकूण 71 गुन्हे दाखल करण्यात आले असून 81 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या मोहिमेत सुमारे ₹1 कोटी 19 लाख 95 हजार 535 रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांमध्ये एकूण 3,042 दुकाने व पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात 587, परभणीत 658, हिंगोलीत 438 तर लातूरमध्ये 1,359 ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘खबऱ्यां’च्या मदतीने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असून नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांविषयी माहिती देऊन सहकार्य करावे.
या मोहिमेमुळे गुटखा माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर