सोयाबीन चोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; 6 आरोपी जेरबंद, ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त.
*सोयाबीन चोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; 6 आरोपी जेरबंद, ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त.*
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला असून, 6 आरोपींना अटक करून तब्बल ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी समीर अहमद पठाण (वय 31 वर्षे, रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 127/2026, कलम 331, 331(4), 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये दिनांक 16/03/2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 14/03/2026 रोजी पहाटे 01.30 ते सकाळी 08.30 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला व साठवून ठेवलेले 100 कट्टे सोयाबीन (अंदाजे किंमत ₹2,50,000/-) चोरून नेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्याचे बारकाईने विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले—
1)अभिषेक सुहास यादव (वय 21, रा. स्वराज्य नगर, लातूर)
2) सुशील सुनिल नाथभजण (वय 21, रा. राजेशिवाजी नगर, लातूर)
3)अजय महादेव जमदाडे (वय 20, रा. राजेशिवाजी नगर, लातूर)
4)रमजान वजीर शेख (वय 29, रा. शिऊर, ता. जि. लातूर)
5)आर्यन माणिक कांबळे (वय 19, रा. वरवटी, ता. जि. लातूर)
6)विनोद गोविंद सुरवसे (वय 26, रा. वरवटी, ता. जि. लातूर)
सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन पिकअप वाहने (अंदाजे किंमत ₹12,00,000/-) तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन (₹2,50,000/-) असा एकूण ₹14,50,000/- (चौदा लाख पन्नास हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच स्थानिक गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (लातूर शहर) यांच्या नियंत्रणाखाली
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिमराव बेल्लाळे, पोलीस अमलदार बळवंत भोसले,राजाभाऊ म्हस्के,अक्षय डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.