“बसस्थानकातील गर्दीत दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर लातूर पोलिसांची कारवाई; एक महिला अटकेत, अनेक गुन्हे उघड.”
“बसस्थानकातील गर्दीत दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर लातूर पोलिसांची कारवाई; एक महिला अटकेत, अनेक गुन्हे उघड.”
नमस्कार. लातूर जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या नवीन बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या महिलांवर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. यावेळी पूनम जितू कांबळे, वय ३४ वर्षे, रा. उदगीर हिला ताब्यात घेण्यात आले. तिची तपासणी केली असता सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी असा सुमारे १३ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल मिळून आला.
चौकशीत आरोपीने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे हिच्यासह औसा, शिरूर ताजबंद आणि अहमदपूर बसस्थानक परिसरात मागील काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात औसा व अहमदपूर पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, दुसरी आरोपी फरार असून तिचा शोध सुरू आहे.
प्रवाशांनी बसस्थानक परिसरात मौल्यवान वस्तूंबाबत सतर्क राहावे, तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.