वृत्तपत्राच्या व पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन
वृत्तपत्राच्या व पत्रकारांच्या विविध
मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन
लातूर, दि. २३(प्रतिनिधी):- व्हॉईस ऑफ मीडिया तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना पत्रकार व वृत्तपत्र उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असला तरी गेल्या काही वर्षांत वाढत्या खर्चामुळे या क्षेत्रावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज व मनुष्यबळ यांसारख्या खर्चात सुमारे 150 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही वाढ न झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांसाठी राज्यभर मागील तीन दिवसांपासून लाक्षणिक आंदोलन सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.
प्रमुख मागण्या:
सन 2019 ते मार्च 2026 या कालावधीत महागाईनुसार जाहिरात दरात किमान 150 टक्के वाढ करण्यात यावी.
ई-टेंडर जाहिराती संपूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्यात.
शासकीय जाहिरातींसाठी किमान 200 चौ.से. आकार निश्चित करावा.
जाहिरातींचे देयक 30 दिवसांत अदा करून विलंब झाल्यास व्याज देण्यात यावे.
तसेच 10 वर्षे सेवा केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका व 20 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 55 वर्षांवरील पत्रकारांना पेन्शनचा लाभ द्यावा.
लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वितरणात समान संधी देऊन भेदभाव टाळावा.
शासन निर्णय व बैठकींची माहिती पारदर्शकपणे व वेळेत प्रसिद्ध करावी.
सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्याची सक्ती करून अनियमितता थांबवावी.
जाहिरात यादीसाठी प्रलंबित तपासण्या तातडीने पूर्ण करून पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी.
या निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष वामन पाठक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष काकासाहेब घुटे, तालुका अध्यक्ष प्रभाकर शिरूरे यांच्यासह रंगनाथ सगर, धोंडीराम ढगे, मधुकर चलमले, खंडेराव देडे, विठ्ठलराव राऊत, चंद्रकांत इंद्राळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.