नांदेड परिक्षेत्र ई-गव्हर्नन्स सुधारण्यात राज्यात अव्वल; शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री हस्ते सन्मान


नांदेड परिक्षेत्र ई-गव्हर्नन्स सुधारण्यात राज्यात अव्वल; शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री हस्ते सन्मान
नांदेड, दि. 28 मार्च: राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मान करण्यात आला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उमाप यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही यावेळी सादर करण्यात आली.
राज्य शासनाने 7 मे 2025 रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यपद्धती सुधारणा घडवून आणण्यासाठी 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. या अंतर्गत संकेतस्थळ सुधारणा, ‘आपले सरकार’ पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, व्हॉट्सअॅपद्वारे सेवा वितरण यांसारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला होता.
नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतस्थळ अद्ययावत करून नागरिकाभिमुख करण्यात आले. विविध शासकीय सेवा व योजनांचे एकत्रीकरण, तक्रारींचे वेळेत निवारण, ई-ऑफिसमुळे कागदविरहित कामकाज, तसेच जलद फाईल निपटारा यामुळे कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
तसेच ‘संवेदना’ ही एआय आधारित संगणकीय प्रणाली, नागरिकांच्या तक्रारींसाठी फीडबॅक सुविधा, ‘Eagle Eye’ प्रणालीद्वारे गुन्हे तपासावर देखरेख आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘खबर’ हेल्पलाईन (9150100100) हे उपक्रम विशेष ठरले.
या कार्यक्रमाची मुदत 10 जानेवारी 2026 रोजी पूर्ण झाल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत प्राथमिक मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर अंतिम मूल्यांकन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्याकडून करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत नांदेड परिक्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला.
या यशामध्ये परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच तांत्रिक सहाय्यक संस्थांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नमूद केले. भविष्यातही नागरिकांना अधिक सक्षम व जलद सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर