लातूर जिल्हा पोलीस दला कडून ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत असून पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी देण्याचा पोलीस प्रशासनाचा ठाम निर्धार आहे.

*पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर*

    
                *प्रेस नोट*

             *दि. ११/०२/२०२६*


*लातूर जिल्हा पोलीस दलातील ४६ पदांसाठी भरती प्रक्रियेस प्रारंभ – पहिल्याच दिवशी २१३ उमेदवारांची उपस्थिती; पारदर्शक, सुयोजित व काटेकोर नियोजनात मैदानी चाचणी.*

           लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई ३० व चालक पोलीस शिपाई १६ अशा एकूण ४६ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेस आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, लातूर येथे मैदानी चाचणीद्वारे अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला. सदर भरती प्रक्रिया दिनांक २३/०२/२०२६ पर्यंत नियोजित असून या कालावधीत सर्व पात्र उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी काटेकोरपणे पार पाडली जाणार आहे.
            भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सकाळी लवकर मैदानी परीक्षेस सुरुवात करण्यात आली. एकूण २१३ उमेदवार उपस्थित राहून त्यांनी विविध शारीरिक चाचण्यांमध्ये सहभाग नोंदविला. उमेदवारांची शारीरिक क्षमता, व इतर आवश्यक निकषांच्या आधारे अचूक मोजमाप पद्धतीने तपासणी करण्यात आली. प्रत्येक इव्हेंटमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक तांत्रिक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला आहे.
               भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसुविधांचा विशेष विचार करून पोलीस प्रशासनाकडून सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था, उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारणी, विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा तसेच तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लांबवरून येणाऱ्या उमेदवारांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर किंवा उघड्यावर थांबावे लागू नये, यासाठी पोलीस मुख्यालयातील नटराज रंगमंदिर येथे निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रकाशव्यवस्था तसेच तात्पुरत्या स्वरूपातील स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
सदर भरती प्रक्रिया मा. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या थेट देखरेखीखाली अत्यंत पारदर्शकपणे व निष्पक्षतेने पार पाडली जात आहे. प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व छायाचित्रण करण्यात येत असून प्रत्येक उमेदवाराची कामगिरी नोंदवहीत अचूकरीत्या नोंदवली जात आहे. मा. पोलीस अधीक्षक स्वतः पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

            लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, सदरची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये किंवा कोणासोबतही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. भरती प्रक्रियेत कोणतीही शिफारस, मध्यस्थी किंवा गैरमार्ग अवलंबिला जाणार नाही. तसेच उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची उत्तेजक औषधे, कामगिरी वाढविणारी प्रतिबंधित औषधे किंवा इतर अनधिकृत मार्गांचा अवलंब करू नये. असे आढळून आल्यास संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
             लातूर जिल्हा पोलीस दला कडून ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत असून पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी देण्याचा पोलीस प्रशासनाचा ठाम निर्धार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर