लातूर पोलिस भरती प्रक्रियेला डिजिटल बळ; पारदर्शकतेचा नवा आदर्श

 लातूर पोलिस भरती प्रक्रियेला डिजिटल बळ; पारदर्शकतेचा नवा आदर्श
    लातूर, दि.१४| (प्रतिनिधी): लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित करण्यासाठी अमोल तांबे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस यांच्या धोरणानुसार राबविण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानाधारित भरती प्रक्रियेमुळे पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.
भरती प्रक्रियेच्या सुरुवातीलाच उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी (फिंगरप्रिंट रेकग्निशन) करण्यात येत आहे. मैदानी चाचणीदरम्यान नोंदवलेली बायोमेट्रिक माहिती लेखी परीक्षेच्या वेळी पुन्हा पडताळली जात असल्याने मैदानी चाचणी देणारा व लेखी परीक्षेला उपस्थित राहणारा उमेदवार एकच असल्याची खात्री संगणकीय पद्धतीने केली जाते. यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना पूर्णतः आळा बसतो.
धावण्याच्या मैदानी चाचणीत शंभर टक्के अचूकता सुनिश्चित करण्यासाठी RFID (Radio Frequency Identification) चिप प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक उमेदवाराच्या पायाला सुरक्षितपणे RFID चिप स्ट्रॅप बांधण्यात येतो. या चिपद्वारे धाव सुरू होताच अंतर व वेळेची सेकंदागणिक डिजिटल नोंद होते. लांब पल्ल्याच्या धावण्यात प्रत्येक फेरीची स्वयंचलित मोजणी केली जाते. प्रत्येक RFID चिप उमेदवाराच्या विशिष्ट नोंदणी क्रमांकाशी जोडलेली असल्याने फसवणुकीची कोणतीही शक्यता राहत नाही.
भरती प्रक्रियेच्या संपूर्ण परिसरात उच्च क्षमतेचे CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, स्वतंत्र डिजिटल नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जात आहे. प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याने पारदर्शकतेस ठोस पुरावा मिळतो आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व शंकामुक्त बनते.
याशिवाय सर्व उमेदवारांची माहिती, गुणांकन, वेळ नोंदी व निकाल पूर्णतः संगणकीकृत डेटा व्यवस्थापन प्रणालीद्वारे हाताळले जात आहेत. त्यामुळे त्रुटीची शक्यता संपुष्टात येऊन धाव चाचणी पूर्ण होताच उमेदवारांना वेळेची त्वरित माहिती मिळत आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित बनवली असून, बायोमेट्रिक ओळख प्रणाली, RFID तंत्रज्ञान, CCTV मॉनिटरिंग व संगणकीकृत डेटा व्यवस्थापनामुळे ही भरती प्रक्रिया भविष्यातील प्रशासनासाठी आदर्श ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर