लातूर जिल्ह्यात मटका व अवैध दारूविक्रीविरुद्ध पोलिसांचा कडक प्रहार; एका दिवसात १४ आरोपींवर १४ गुन्हे दाखल
लातूर, दि. ४ (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात गुप्तपणे सुरू असलेल्या मटका जुगार व अवैध मद्यविक्रीसारख्या समाजविघातक धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाकडून व्यापक व कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एका दिवसात तब्बल १४ आरोपींविरुद्ध १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये मटका जुगाराचे ८ तर दारूबंदी कायद्यांतर्गत ६ गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली लातूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी व्यापक कारवाई करण्यात आली.
मटका जुगार प्रकरणात गांधी चौक, शिवाजीनगर, विवेकानंद व विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, शिवाजीनगर व विवेकानंद पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, तर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच दारूबंदी कायद्यांतर्गत गांधी चौक, गातेगाव, उदगीर शहर, वाढवना व कासार सिरसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, अवैधरीत्या मद्यसाठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व गुन्ह्यांमध्ये १४ आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे. भविष्यात हे आरोपी पुन्हा अवैध धंद्यांमध्ये सहभागी होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असून, आदेशांचे उल्लंघन केल्यास पुन्हा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लातूर जिल्ह्यात मटका, जुगार व अवैध मद्यविक्री यांसारख्या समाजविघातक धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार आहेत.”