जेतवन (ता. नांदेड) येथील गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणी २३ फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
जेतवन (ता. नांदेड) येथील गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणी २३ फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
(अरूण जे. कांबळे)
लातूर/नांदेड, दि. २३ (प्रतिनिधी) : जेतवन (ता. नांदेड) येथील गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या कारभारातील अनियमितता आणि प्रशासकीय आदेशांचे पालन न केल्याचा आरोप करत सभासदांनी २३ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मा. विभागीय सहनिबंधक, लातूर विभाग, लातूर यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित संस्थेच्या कार्यकारिणीला यापूर्वी बरखास्त करण्यात आले असून १७ मे २०२४ पासून श्री. एम. आर. येवते यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून संस्थेचे रेकॉर्ड ताब्यात न घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न करणे तसेच कार्यवाहीत टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड तसेच मा. कार्यकारी दंडाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशांचे पालन झाले नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८० अन्वये कारवाई करण्याचे निर्देश देऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २३ फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा डॉ. चंद्रशेखर अबुल नारायणराव व इतर सभासदांनी दिला आहे.