सामाजिक बांधिलकीचे कार्य गौरवास्पद; आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख संजयजी पाटील यांना दैनिक लोकमतचा पुरस्कार

सामाजिक बांधिलकीचे कार्य गौरवास्पद; आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख संजयजी पाटील यांना दैनिक लोकमतचा पुरस्कार
       लातूर, दि. १७ (प्रतिनिधी):  लातूर शहरात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सातत्याने आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्रचे प्रमुख संजयजी पाटील यांना दैनिक लोकमतच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा गौरव सोहळा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला असून श्रीमंती वर्षाजी ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी लातूर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मान समारंभास दैनिक लोकमतचे प्रतिनिधी धर्मराज हल्लाळे तसेच अँड. शितलजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व हितचिंतक यावेळी उपस्थित होते.
व्यसनमुक्तीसाठी अखंड कार्याची दखल
आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून संजयजी पाटील यांनी व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन, उपचार व पुनर्वसनाच्या मार्गाने मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचविणे, युवकांना व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढणे तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, या कार्याची दखल घेत दैनिक लोकमतच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
“सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व” म्हणून गौरव
लातूर शहरातील सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणून संजयजी पाटील यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षाजी ठाकूर घुगे यांनी, “समाजातील व्यसनाधीनतेसारख्या गंभीर प्रश्नावर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती समाजासाठी आदर्श ठरतात. आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्राचे कार्य प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन केले.
पुरस्कार स्वीकारताना कृतज्ञता व्यक्त
पुरस्कार स्वीकारताना संजयजी पाटील यांनी हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांना, कुटुंबीयांना तसेच आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्राशी जोडलेल्या सर्व लाभार्थ्यांना अर्पण केला. “हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे तर समाजातील प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे, जी व्यसनमुक्तीसाठी संघर्ष करत आहे. भविष्यातही हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवू,” असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
विशेष अभिनंदन व शुभेच्छा
या गौरवाबद्दल भूमिपुत्र शिवयोध्दा स्वराज्य प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने संजयजी पाटील यांचे विशेष अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असून, पुढील काळातही असेच सामाजिक कार्य अखंड सुरू राहो, अशा सदिच्छा प्रतिष्ठानकडून व्यक्त करण्यात आल्या.
हा पुरस्कार सोहळा लातूरच्या सामाजिक जीवनात प्रेरणादायी ठरला असून, समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला योग्य सन्मान मिळाल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये दिसून आली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर