छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लातूरमध्ये प्रसाद वाटपाचा कार्यक्रम
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता लातूर शहरातील गणेश मंदिर, गणपती चौक येथे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नंदादीप वार्ता न्यूज लाईव्ह चॅनल वतीने करण्यात आले असून ३९६ वी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश वाघमारे, माजी प्राचार्य, शाहू महाविद्यालय, लातूर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथील सहाय्यक उपसंचालक श्री. शाम टरके आणि ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लातूर समाचारचे संपादक श्री. दयानंद जडे हे मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शनपर मनोगत होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने होणार असून त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहेत. शिवरायांचे विचार, त्यांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनपर भाषणानंतर उपस्थित शिवप्रेमी नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांचा आदर्श, कर्तृत्व आणि विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास लातूर शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक नंदादीप वार्ता न्यूज लाईव्ह चॅनलचे मुख्यसंपादक खंडेराव देडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.