साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कारार्थींच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कारार्थींच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन
नांदेड, दि. २३ फेब्रुवारी २०२६ : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कारार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे.
समितीच्या वतीने कळविण्यात आले की, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या पुरस्कारार्थींना वयोमानानुसार विविध शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उपचार व उदरनिर्वाहासाठी आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना दरमहा किमान १५,००० रुपये मानधन मंजूर करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसमधून (शिवशाही, शिवनेरीसह) मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचा विचार करून राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी, तसेच पुरस्कारार्थींना रेल्वे प्रवासात सवलत मिळण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.