६ लाखांच्या अपहाराचा बनावट चोरीचा कट उघड; दोन आरोपी अटकेत, ५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, दि. २० (प्रतिनिधी) – शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ६,००,००० रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कौशल्यपूर्ण तपास करून बनावट चोरीचा बनाव उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ५,५०,००० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गु.र.नं. ५३/२०२६, कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, जावेद जलील शेख (वय २७, रा. इस्लामपुरा, लातूर) हा टिळक नगर येथील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. संबंधित सेंटरमध्ये ग्राहकांकडून जमा होणारी रक्कम बँकेत भरण्याची जबाबदारी काहीवेळा जावेद शेख व त्याचा सहकारी अर्शद शेख यांच्याकडे दिली जात असे. ही माहिती जावेदने त्याचा मित्र आकाश प्रकाश ढगे (वय ३०, रा. जोडजवळा, ता. जि. लातूर) याला दिली.
दोघांनी संगनमताने अर्शद शेख यांच्या स्कूटरची बनावट चावी तयार करून स्कूटरच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम चोरी करण्याचा कट रचला. दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी डायग्नोस्टिक सेंटरकडून जावेदकडे ९० हजार रुपये तर अर्शदकडे ६ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी देण्यात आले. दोघांनी संबंधित रक्कम आपल्या स्कूटरच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर चहाच्या स्टॉलवर थांबले असता जावेदने आकाशला फोन करून माहिती दिली. काही वेळात अर्शदची स्कूटर गायब झाली. नंतर ती हायटेक सेंटरसमोरील बोळात सापडली; मात्र डिक्कीत ठेवलेले ६ लाख रुपये गायब होते.
या प्रकरणी ८ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान जावेद शेख याला खोरी गल्ली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात चोरीची रक्कम आकाश ढगे याच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार जोडजवळा येथे सापळा रचून आकाश ढगे याला १७ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जावेद शेखसोबत संगनमताने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील ६ लाखांपैकी ५० हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले असून उर्वरित ५,५०,००० रुपये त्याने जोडजवळा येथील भावाच्या घरात लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.