लातूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२०२५ अंतर्गत चालक पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीला सुरुवात!
लातूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२०२५ अंतर्गत चालक पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीला सुरुवात!
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती २०२४–२०२५ अंतर्गत शारीरिक मोजमाप व शारीरिक मैदानी चाचणी प्रक्रियेला आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे चार वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया Latur District Police यांच्या पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे राबविण्यात येत आहे.
आजच्या दिवशी एकूण ८०० पुरुष उमेदवारांना शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. यापैकी ४८९ उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर ३११ उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उपस्थित असलेल्या ४८९ उमेदवारांपैकी १७ उमेदवार शारीरिक मोजमाप चाचणीत अपात्र ठरले आहेत. उर्वरित ४७२ उमेदवार हे १६०० मीटर धावणे आणि गोळाफेक अशा शारीरिक मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले असून त्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. या उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी अधिकृत संकेतस्थळ www.laturpolice.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली असून पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस मुख्यालयाच्या दर्शनी भागावरही लावण्यात आली आहे.
दरम्यान, या गुणांच्या यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी ४८ तासांच्या आत sp.latur@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित वेळेनंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उद्या, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी चालक पोलीस शिपाई पदासाठी पुढील टप्प्यातील मैदानी चाचणी होणार असून सर्व उमेदवारांनी पहाटे चार वाजता पोलीस मुख्यालय, बाभळगाव येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र, मूळ अर्ज, वाहन परवाना, ओळखपत्रे आणि आवश्यक कागदपत्रांसह तयारीनिशी उपस्थित राहावे, असे पोलीस प्रशासनाने कळवले आहे.