आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांची व्यापक तयारी; शांतता समिती बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा निर्धार
लातूर, दि.१३ (प्रतिनिधी) : आगामी काळात साजरे होणारे विविध धर्मीय सण-उत्सव शांततेत, उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडावेत, या उद्देशाने लातूर पोलीस दलाच्या वतीने शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ही बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथील मीटिंग हॉलमध्ये पार पडली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी भूषविले.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस दलाच्या विविध शाखांचे अधिकारी यांच्यासह सर्व जाती-धर्मातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, समाजसेवक, तसेच विविध मंडळे व समित्यांचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, जय सेवालाल जयंती, रमजान महिना व रमजान ईद, होळी, धुलीवंदन, रंगपंचमी तसेच इतर सर्वधर्मीय सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी संवेदनशील भागांचे विश्लेषण, मिरवणुकांचे मार्ग, धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, सोशल मीडिया देखरेख व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व मान्यवरांनी मांडलेल्या अडचणी, सूचना व अपेक्षा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने ऐकून घेतल्या. या सर्व बाबींवर योग्य त्या उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “लातूर शहर हे सुसंस्कृत, शांतताप्रिय व सर्वधर्मसमभाव जपणारे शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करताना नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांनी सजग राहून कोणत्याही अफवा किंवा समाजविघातक प्रवृत्तींना थारा देऊ नये.”
🔒 पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रमुख उपाययोजना
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले असून त्यात पुढील प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे—
संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त तैनात करणे
जीप पेट्रोलिंग व पायी गस्त वाढविणे
“गुड मॉर्निंग स्कॉड” सतर्क ठेवणे
एसआरपीएफ प्लाटून, ९६० पुरुष होमगार्ड व १५० महिला होमगार्डची नेमणूक
प्रमुख मशिदी, ईदगाह व कब्रस्तान परिसरात विशेष बंदोबस्त
सण-उत्सव काळात वाहतूक नियोजन व पर्यायी मार्गांची अंमलबजावणी
अफवा पसरविणाऱ्यांवर व भडकावू संदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई
सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मॉनिटरिंग सेल कार्यरत
अवैध मद्यविक्री व इतर गैरप्रकारांविरोधात विशेष मोहिम
नाकाबंदी व रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ
महिला सुरक्षेसाठी विशेष पथक सक्रिय
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अंतर्गत आवश्यकतेनुसार अधिसूचना
महत्त्वाचे पुतळे, मंदिरे, मशिदी व धार्मिक स्थळांवर अतिरिक्त बंदोबस्त
डीजे व ध्वनीप्रदूषणासंदर्भात वेळ व ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन
बैठकीच्या शेवटी शांतता समितीच्या सर्व धर्मीय प्रतिनिधींनी सण-उत्सव शांततेत, सलोख्याने व बंधुभावाने साजरे करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. कोणत्याही अफवा, भडकावू संदेश किंवा समाजविघातक कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असे एकमताने नमूद करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करत, “लातूर पोलीस दल हे सर्व सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णतः सज्ज आहे,” असा विश्वास व्यक्त केला.