मोबाईल हिसकावून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाशएमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ४.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोबाईल हिसकावून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई;
४.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर : लातूर शहरात वाढत्या मोबाईल चोरी व मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटनांवर आळा घालण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मोबाईल हिसकावून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, सुमारे ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
याप्रकरणी फिर्यादी बाळासाहेब विष्णु डोंगरे (वय ४०, रा. शासकीय पोलीस वसाहत, एमआयडीसी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. २२/२०२६, कलम ३०४(२), ३(५) बीएनएस अन्वये दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान मोबाईल हिसकावला
दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता, जुना एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील सॅमसंग एस–२५ अल्ट्रा मोबाईल (किंमत अंदाजे १,१२,५०० रुपये) हिसकावून पलायन केले होते.
गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जमा केले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत आरोपींची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्यात आले.
आरोपी निष्पन्न
पोलिसांनी खालील आरोपींना अटक / ताब्यात घेतले आहे —
विकास बाळू राठोड (वय २२, रा. कानडी बोरगाव, ह.मु. विकास नगर, लातूर)
प्रजापती मुरलीधर सोनवणे (वय ४५, रा. वाल्मीकीनगर, लातूर)
एक विधी संघर्षग्रस्त बालक
तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी प्रजापती मुरलीधर सोनवणे हा संविधान चौक, लातूर येथील सत्यम मोबाईल शॉपचा मालक असून, चोरीस गेलेल्या मोबाईलचे पॅटर्न लॉक तोडणे, डेटा क्लिअर करणे व ते पुन्हा विक्रीयोग्य बनवणे अशा प्रकारे तो गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग घेत होता. मोबाईल चोरीला व्यावसायिक स्वरूप देण्याचे काम तो करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त
आरोपींकडून —
फिर्यादीचा हिसकावलेला मोबाईल
इतर १६ मोबाईल फोन (किंमत अंदाजे २,५०,००० रुपये)
गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल
मोबाईल लॉक तोडण्यासाठी वापरण्यात आलेला संगणक संच
असा एकूण ४,५७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली असून, जप्त मोबाईलच्या आधारे संबंधित मोबाईल धारकांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पथकाचे कौतुक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि भाऊसाहेब खंदारे, पोउनि सुरेश पोगुलवार, डीबी पथकाचे सपोउपनि भिमराव बेल्लाळे, तसेच पोलीस अमलदार बळवंत भोसले, राजाभाऊ म्हस्के, रामभाऊ जाधव, अक्षय डिगोळे, विश्वनाथ डोंगरे यांनी पार पाडली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.