अमित देशमुख यांचे फिरले वारे; नुसतेच हातवारे आणि तेच तेच इशारे....!
*अमित देशमुख यांचे फिरले वारे; नुसतेच हातवारे आणि तेच तेच इशारे*
लातूर, दि. १२(प्रतिनिधी): लातूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत दिसत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेवटच्या क्षणी ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र या सगळ्या गदारोळात विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख यांचा प्रचार पाहता “जुनंच तेच” अशीच प्रतिक्रिया लातूरकरांतून उमटत आहे. पूर्वीप्रमाणे शेरोशायरी, हातवारे आणि इशाऱ्यांच्या जोरावर वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण या प्रचारामागे ठोस कामाचा आधार मात्र दिसत नाही.
सत्ता हातात असताना लातूरच्या ज्वलंत प्रश्नांकडे त्यांनी कधी गांभीर्याने लक्ष दिले नाही, हा आरोप आता उघडपणे केला जात आहे. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, रोजगाराचा अभाव, आरोग्य सुविधांची कमतरता—हे प्रश्न त्यांच्या कार्यकाळात जैसे थे राहिले. निवडणूक आली की शहरात अवतरणे आणि निकाल लागला की “मुक्काम पोस्ट मुंबई” असा पत्ता ठेवत लातूरमधून गायब होणे, हे तंत्र अनेक निवडणुकांपासून कायम आहे, अशी टीका कार्यकर्त्यांतून होत आहे.
मागील निवडणुकीत ते काठावर निवडून आले होते, हे वास्तव लातूरकर विसरलेले नाहीत. तरीही उसना अविर्भाव आणत पुन्हा एकदा जुनेच प्रश्न दाखवून ते सोडवण्याचे दावे केले जात आहेत. खडक शब्दांत सांगायचं तर, जे स्वतःच्या काळात जमलं नाही, ते आता भाषणांनी होणार का, असा सवाल मतदार विचारत आहेत. प्रचारात आवाज मोठा आहे, पण कामाचा हिशेब मात्र शून्य आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरसाठी ठोस शब्द दिला आहे. शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणे, उद्योग सुरू करणे, शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने शहरात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच यावेळी लातूरकरांचा कल बदलताना दिसत असून “यावेळी कमळ फुलणार” अशी चर्चा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जोर धरू लागली आहे.